Friday, February 24, 2017

"देवाचे Customer care"

अखेर त्या दिवशी देवाने custmer care सुरु केले
तक्रार करता यावी म्हणून फोन नंबर दिले

सकाळपासून तक्रारीचा पूरच वाहत होता
दर सेकंदाला तिथला टेलिफोन खणऽखणऽऽत होता

"नशिब माझे कसे देवा पैसा मिळत नाही
बायको मला कशी दिली ती माझे ऐकत नाही

म्हैस हरवली चार दिवसाने अजून सापडत नाही
दहा वर्ष झाली लग्नाला अजून मुलगा नाही

नोकरीत बढती मिळेल देवा अशी तजवीज करा
मुलगा शिकतो इंजिनिअरिँग ला त्यालाही पास करा

सर्वाँना गाड्या आहेत मलाच तेवढी नाही
आम्हाला अजून घर नाही त्याचीही दखल घ्यावी

सर्वाँना "गोरे" बणवले मग माझ्यावरच का कोपला होता
माझ्यावेळीच तुझ्याइथला का देवा "रंग" संपला होता?

सासू कसली खट्याळ इतकी देवा तु मला दिली
घेऊन जा तिला एकदा अजून वेळ नाही का झाली?

सुनेला काही वळणच नाही तिला जरा अद्दल घडव
जावई माझा "दशमग्रह" त्याला माझ्या पाया पडव

संपत्ति वाटताना देवा तु पक्ष:पाती झालास
इतरांना श्रीमंत करुन मलाच गरीब केलंस

यंदाच्या निवडणूकीत खुर्ची तेवढी मिळूद्या देवा
जनतेच्या जनार्धनाला या करुद्या थोडीसी सेवा

सर्व दुःखे देवा काय तु माझ्या वाट्यास लिहली
सुखाची पाने नाही का नशिबी माझ्या ठेवली?

 सृष्टिचा कारभार देवा तुम्हाला नीट चालवता येत नाही
तुम्ही असताना भूकंप,त्सुनामी,दुष्काळ का तो येई

का इथली मुले देवा उपाशी पोटी झोपतात
थंडीने गारठून का ती तिथेच जीव सोडतात

भ्रष्टाचार इथला देवा तु का थांबवत नाही
स्रीयांवरच्या अत्याचाराला लगाम का लावत नाही"

अशा तर्हेने अनेकांनी देवाला फोन केले
प्रत्येकानी त्याच्या परीने जाब विचारुन घेतले

सर्वाचे म्हणने देवानी शांतपणे ऐकून घेतले
स्मितहास्य करुन थोडेसे,उत्तर देवांनी दिधले

"आतापर्यत तुझ्या वाचेने जे जे तु वदलास
या सर्वाँचा का कधि तु विचार मनी केलास?

दिधला मी तुज हा अमूल्य देह मानवाचा
ईच्छाशक्ति, स्वातंत्र्य,सामर्थ्य अन् कर्तृत्वाचा

तुझ्या कर्मयोगाने तु जीवन सुंदर बनवशील
वाटले न मज तु स्वार्थी,भोगी रडका बनशील

यंत्रासंगे संवेदना ही तुझ्या बधिर झाल्यात
बलात्कारी,मूढ मुर्खा बेशर्म तू झालात

बेलगाम वर्तनाने तुझ्या तु समस्या निर्माण केल्या
शोधता उत्तर प्रश्नाचे तू प्रश्नांतच अड़कला गेला

नात्यातल्या भावनेचा ओलावा तुला कळला नाही
मानव्याने कसे जगावे  हे ही समजले नाही

या सृष्टिच्या सौंदयाशी सुर तुझे कधि जुळले नाही
ओरबाडणे जमले तुला ममत्व समजले नाही

दोषारोप करणे दुसर्यावर हा स्वभाव तुझा बणला
स्वत:च्या आत डोकावून बघ त्यामुळेच तु पुरता खंगला

नव्या दमाने उभा रहा तु कर्तृत्वाची कास धर
या सृष्टीवर प्रेम कर अन जीवन सुंदर मग बघ!"

एवढे सगळे ऐकून देवाचे मानव खजील झाला
"चुकलेच देवा थोडेसे माझे पण अजून वेळ न गेला

जगण्याला मी बनवीन सुंदर या सृष्टीवर प्रेम करीन
मानवता ह्रदयात बाणूनी खरा मानव मी होईन"

झोपेतच हसत हसत बंडूने देवाला नमस्कार केला
"उठ ना रे बंड्या लवकर!"आईने आवाज दिला.

---राजेश खाकरे

Tuesday, February 21, 2017

"लग्न ...!"

     "लग्न ...!"

लग्न म्हणजे नेमकं काय असतं...?     
      
     
ते केवळ कर्तव्यबंधन नसतं तर
     
दोन मनांचं अतूट बंधन असतं
     
ते जबाबदारी नसून 
     
आपल्याला हवंहवंसं वाटणारं
     
स्टेशन असतं...

लग्न म्हणजे नेमकं काय असतं...?       

     
नाजूक अशा गवताचं पातं असतं
     
म्हणूनच त्याला हळूवार जपायचं असतं
     
कर्तव्यपूर्तीने नव्हे,
     
तर एकमेकांच्या सुखदुःखाने
     
तुडुंब भरायचं  असतं...

लग्न म्हणजे नेमकं काय असतं...?

      '
आज लवकर येईन! 'असं म्हणत 
     
त्याने कामावर जायचं असतं 
     
उशीर झाला म्हणून तिने रुसताच
     
त्याने हळूच केसांत फूल माळायचं असतं ...

लग्न म्हणजे नेमकं काय असतं...?

      "
आज छान दिसतेय!" असं म्हणून
     
तिचं सौंदर्य खुलवायचं असतं 
     
तर "हा शर्ट शोभतोय तुम्हाला!"
     
असं म्हणून तिने भलतंच धीट व्हायचं असतं ...

लग्न म्हणजे नेमकं काय असतं...?

     
त्याच्या चुकांना तिने 
     
पोटात घ्यायचं असतं 
     
तर तिच्या दुःखांना त्याने
     
हृदयात सामावून घ्यायचं असतं...

लग्न म्हणजे नेमकं काय असतं...?

     
त्याच्या बेफिकीरीला तिच्या 
     
काळजीचं पांघरूण असतं 
     
तर तिच्या दुःखाला त्याच्या 
     
आधाराचं पांघरूण असतं...

लग्न म्हणजे नेमकं काय असतं...?

     
अबोल भावनांना अंतर्मनाने जाणायचं असतं 
     
तो चिडला की तिने शांत राहायचं असतं 
     
तिने रूसताच त्याने मनवायचं असतं...

लग्न म्हणजे नेमकं काय असतं...?

     
झालंच भांडण तर
     
त्याला कवटाळायचं नसतं
     
एकाने विस्कटलं तरी
     
दुसऱ्याने सावरायचं असतं 

लग्न म्हणजे नेमकं काय असतं...?

     
कधी दोघांचं मनोमिलन असतं
     
तर कधी दोघांचं भांडण असतं
     
संसारातल्या संशयवादळाला
     
दाराबाहेरच थोपवायचं असतं...

लग्न म्हणजे नेमकं काय असतं...?

     
प्रेमाचं ते बंधन असतं
     
दोन अनोळखी जीवांचं मिलन असतं 
     
सृष्टीनिर्मात्याने स्वर्गात बांधलेलं एक
       
रेशीमबंध असतं 
     
म्हणून त्याला शेवटपर्यंत निभवायचं असतं...

                           
                                -
प्रज्ञा खैरनार-देसाई